मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९९ मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता.
गटनेतेपदी शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका आणि तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पार्टीने २ जागा जिंकल्या आहेत.

