मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळफेक आणि शेणाचा मारा करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या गाडीवर नारळ आणि शेणाचा मारा केल्यानंतर मनसेचे जवळपास ४४ कार्यकर्ते पसार झाले होते. यापैकी कोणीही अद्याप ठाणे पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
मात्र, या कार्यकर्त्यांवर कठोर पोलिस कारवाई होण्याची शक्यता आहे. मनसेच्या या कार्यकर्त्यांना अटक झाल्यास जामीन मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि मनसेची कायदेशीर टीम कशाप्रकारे पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनबाहेर राडा घालणा-याा मनसेच्या ४४ कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता. रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलेल्या या मनसैनिकांचा शोध पुन्हा सुरू केल्याची माहिती आहे.