कोपेनहेगन : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने त्यांच्या देशातील लहान मुलांवर सोशल मीडिया वापरावर बंदी घातली होती. आता डेन्मार्कने देखील असाच निर्णय घेतला आहे. डेन्मार्क सरकारने १५ वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. जग वेगानं डिजीटल होत आहे. त्यामुळं युवा युजर्सना टार्गेट करणारे हानीकारक कंटेट मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. हा एक जागतिक चिंतेचा विषय बनला आहे.
डेन्मार्कचे डिजीटल विषयक मंत्री कॅरोलीन स्टेज यांनी सांगितले की, डेन्मार्कमधील १३ वर्षाखालील ९४ टक्के मुलांची कमीतकमी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल आहे. तर १० वर्षाखालील निम्यापेक्षा जास्त मुलांची एका तरी सोशल मीडियावर प्रोफाईल आहे.
स्टेज यांनी सांगितले की, ते जेवढा वेळ ऑनलाईन घालवतात तेवढे ते हिंसाचार आणि स्वत:च नुकसान करून घेणा-या ऑनलाईन कंटेटचा सामना करतात. आमच्या मुलांसाठी हे खूप धोकादायक आहे. स्टेज यांनी मोठ्या टेक कंपन्यांचे देखील कान टोचले आहेत. त्यांनी या कंपन्यांकडे भरपूर पैसा आहे मात्र ते आमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी, आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. आम्ही लवकर याबाबत कायदा करू असं आश्वासन देतो. मात्र आम्ही याबाबत घाई गडबड करणार नाही. आम्हाला आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे का, याची खातरजमा करून घ्यायची आहे. टेक कंपन्याबाबत कोणतीही त्रुटी राहू नये. टेक कंपन्यांच्या व्यावसायिक मॉडेलचा मोठा दबाव आहे असं देखील मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

