शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील अंकुलगा राणी येथील दत्तात्रय सूर्यकांत कुंभार या २८ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खासगी वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या कथित जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर डॉ. अरविंद भातांब्रे यांनी कुंभार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच कुटुंबाला आर्थिक मदत करून धीर दिला.
या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. भातांब्रे यांनी केली. कर्जवसुलीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर बेकायदेशीर दबाव किंवा मानसिक छळ होत असेल तर त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दत्तात्रय यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधार हरपला असून त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. संबंधित वित्तीय संस्थांशी प्रशासनाने समन्वय साधून कुटुंबाच्या थकीत कर्जाबाबत योग्य तोडगा काढावा, तसेच शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी चक्रधर शेळके, वैशंपायन जागले, बालाजी चव्हाण, गणेश गुराळे,अरुण काकडे, राजकुमार काळे, नागनाथ पाटील, दयानंद हरगे, दिगंबर पवार, नामदेव गुणाले, उत्तम पांचाळ, विद्यानंद हंचनाळे, गुंडेराव चिंतले यांच्यासह ग्रामस्थ व कुंभार कुटुंबीय उपस्थित होते.
















