लातूर : प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लातूर शहर सजले आहे. विद्युत रोषणाईने शहर नटले आहे. तरुणांमध्ये प्रचंड जोश दिसून येत आहे. संपूर्ण शहरात विविध ठिकाणी बॅनर्स, पोष्टर्स, फलक लावण्यात आलेले आहेत. जयंतीचा उत्साह शिगेला पोहोंचला आहे. आज दि. १४ एप्रिल रोजी सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शहरातील गरुड चौक, स्वामी विवेकानंद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, गंज गोलाईचा परिसर, महात्मा
गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक, पीव्हीआर चौक या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरीचे मोठे बॅनर्स, पोष्टर्स, फलक लावण्यात आले आहेत. तसेच बौद्धनगर, आनंदनगर, इंदिरानगर, विक्रमनगर, सुभेदार रामजीनगर विद्युत रोषणाईने नटले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लातूर पोलिसांच्या सूचनेनूसार दुचाकी रॅली काढण्यात आली नाही. परंतू, काही तरुणांनी पायी रॅली काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार केला. शहरातील प्रत्येक चौकात जयंतीची तयारी करण्यात आली आहे. लातूर पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून रुटमार्च काढला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील समाज मंदीरं, बुद्ध विहारांवरही विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.

