पुणे : आंतरधार्मिक समाज, धार्मिक स्वातंत्र्य आणि शांततेसाठी समर्थन केल्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांना या वर्षी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे आयआरएफ बिल्डर्स फोरम आणि रॉजर विल्यम्स आयआरएफ पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित २०२५ चा ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अमेरिकेतील रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या हस्ते डॉ. राहुल कराड यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाऊंडेशनचे अध्यक्ष ब्रायन जे ग्रिम उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले ‘‘सकारात्मक शांततेच्या तत्त्वांवर बांधलेला समाज लोकांना आधार देतो आणि भविष्यातील संकटांविरुद्ध लढण्याची ताकद देतो. अशा वेळेस उज्ज्वल भविष्याच्या शोधात शांती, ज्ञानाची देवाणघेवाण आणि मानव कल्याणासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे. हा पुरस्कार स्वीकारताना खूप मोठी जबाबदारी पडली आहे.’’
‘‘विद्यार्थ्यांना वैश्विक नागरिक बनविण्यासाठी डब्ल्यूपीयूत पीस स्टडीचा समावेश केला आहे. यातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक अनुभव प्रदान करणे, संवाद साधणे, रचनात्मक, शांततापूर्ण उपयांसाठी कार्य करणे आणि ज्ञान व कौशल्यांनी सुसज्ज आहे. तसेच डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी जगातील सर्वांत मोठ्या वैश्विक शांतता डोमची निर्मिती करून यातून विश्वशांतीचा संदेश दिला जात आहे.’’
यावेळी देश-विदेशातील नावाजलेल्या प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यात आला.