मुंबई : महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने कारवाईचा मोठा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एटीएसने सॉफ्टवेअर इंजिनीअरला ताब्यात घेतले होते, तर आता ठाण्याच्या मुंब्रा येथील एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमागील कारण म्हणजे त्या शिक्षकाचा जमाती इस्लामिया या संघटनेशी संबंध असल्याचा संशय.
एटीएसने पुण्यातील आरोपींना चौकशीत विचारपूस केली असता, मुंब््रयात राहणा-या या शिक्षकाचे नाव समोर आले. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये त्याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत शिक्षकाचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि इतर महत्त्वाची सामग्री जप्त करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी मुंबईतील कुर्ला येथे हलवण्यात आले आहे.
माहिती मिळाल्याप्रमाणे, ताब्यात घेतलेला शिक्षक काही ऑनलाईन ग्रुपमध्ये सक्रिय होता. एटीएसने त्याचे इ-मेल, मेसेजेस आणि बँक व्यवहार यांचे तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे. तपासात याच शिक्षकाचा जमाती इस्लामिया संघटनेशी संबंध आहे का, हे स्पष्ट होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंब्रा, पुणे आणि मुंबई परिसरात पुढील काही दिवसांत आणखी काही ठिकाणी छापेमारी होण्याची शक्यता आहे. एटीएसकडून कारवाई सतत सुरू असल्यामुळे आरोपी आणि त्यांच्या नेटवर्कबाबत अधिक माहिती लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.
पुण्यात अलीकडेच अटक केलेल्या नऊ संशयित अल-कायदा दहशतवाद्यांच्या दाखल विधानांवरून एटीएसने मुंब््रयातील एका शिक्षकाच्या घरातून आणि कार्यालयातून संवेदनशील दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली. या शिक्षकाचे कुर्ला भागातही घर आहे.
यासोबतच, यूपी एटीएसने तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे, जे सर्व डॉ. आदिल यांच्या जवळचे आहेत. यामध्ये एक व्यक्ती देओबंद आणि दोन व्यक्ती सहारनपूर शहरातील आहेत. डॉ. आदिल सहारनपूरमधील लोकांना त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील करत होता. डॉ. आदिलने सुमारे अडीच वर्षांपूर्वी विवाह केला होता, आणि त्याच्या लग्नास सहारनपूरमधील अनेक लोक उपस्थित होते. सध्या यूपी एटीएस पश्चिम उत्तर प्रदेशातील दहशतवादी कटांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत आहे.

