मुंबई : डोंबिवलीतील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे या आगीत २९ दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्वेतील चेडानगर परिसरात असलेल्या रविकिरण सोसायटीत आग लागल्याची घटना घडली. रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट, जय भारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये आग लागली. पहाटे सुमारे ४.१५ वाजता अचानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण २९ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. ही आग इतकी भीषण होती की आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला.
बेसमेंट पार्किंगमध्ये आग लागल्याची समजताच इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते.
इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तपास करत आहेत. शिवाय शॉर्टसर्किट की इतर कोणती तांत्रिक बिघाडाची शक्यता आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत. पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

