धाराशिव : प्रतिनिधी
भूम तालुक्यातील डोकेवाडी येथे चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडली. चोरट्यांनी २७ तोळे सोने व ३ लाख ८७ हजार ५०० रूपये रोख रक्कम असा एकूण १० लाख ६२ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरीची ही घटना दि. ३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे दि. ४ जानेवारी रोजी अनोळखी तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील डोकेवाडी येथील संदीप बळीराम आहेर व त्यांचे चुलते अर्जुन सदाशिव आहेर या दोघांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. दि. ३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
दोघांच्या घरातील २७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ३ लाख ६२ हजार ५०० रूपये असा एकूण १० लाख ६२ हजार ५०० रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी संदीप आहेर यांनी दि.४ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे कलम ४५४, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.