संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील हे सांगता येत नाही. अमेरिकेतील ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रशांत महासागरात थेट काही जहाजांवर हल्ले करून त्यांना नेस्तनाबूत केलं आहे. ट्रम्प यांच्या या कारवाईमुळे अनेक देशांनी अमेरिकेचा निषेध केला. काही देशांनी तर ट्रम्प यांनी अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्यात अशी मागणी केली आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राने ठणकावलं आहे. कायद्याचे उल्लंघन करून तुम्ही कारवाई करू नये, असे ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राने बजावले आहे.
दोन महिन्यांत ट्रम्प यांनी कॅरेबियन आणि प्रशांत महासागरात काही जहाजं उडवून टाकली आहेत. या जहाजांच्या माध्यमातून ड्रग्ज आणि नशेसाठी वापरल्या जाणा-या पदार्थांची तस्करी केली जात होती, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन सैन्याच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत एकूण ६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. हीच बाब लक्षात घेता संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विभागाचे प्रमुख व्होल्कर टुर्क यांनी ट्रम्प यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, असे बजावले. ट्रम्प यांची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. कायद्याला डावलून कोणत्याही प्रकारे लोकांचा जीव घेणे ही हत्याच आहे.
आम्हाला अधिकार-ट्रम्प : दुसरीकडे अशा प्रकारची कारवाई करण्याचा अमेरिकेला अधिकार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. अमेरिकेने कथितपणे ड्रग्ज घेऊन जाणा-या जहाजांना रोखण्यासाठी समुद्रात सैनिकांची गस्त वाढवलेली आहे. तर दुसरीकडे मेक्सिको, कोलंबिया, व्हेनेझुएला या देशांनी अमेरिकेच्या कारवाईची निंदा केलेली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने आवाहन केल्यानंतर आता ट्रम्प या प्रकरणात काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

