नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड आणि थेट शैलीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यावर पंचनाम्यांची मागणी होत आहे. मात्र, कोकाटे यांनी दिलेले ढेकळांचे पंचनामे करायचे का? हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान केले असून, यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतक-यांनी काढणी केलेला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता, पण आर्द्रतेमुळे कांद्याला बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतक-यांकडून कापणी झालेल्या पिकांचाही पंचनामा करावा, अशी मागणी होत असताना कोकाटे यांनी ‘हार्वेस्टिंग झालेलं आहे तिथे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ असा थेट सवाल केला. त्यांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय आपत्ती निधीच्या नियमानुसार फक्त उभ्या पिकांनाच मदत मिळते, घरात किंवा चाळीत ठेवलेल्या कांद्याला नाही.
कांदा साठवणुकीतही अडचणीच अडचणी
शेतक-यांना कांदा वाचवण्यासाठी साठवलेला कांदा पुन्हा बाहेर काढून निवडावा लागतो, जो खर्चिक आणि कष्टसाध्य प्रकार आहे. वाढलेल्या मजुरी दरांमुळे साठवणुकीचा खर्चही गगनाला भिडत आहे.
नियमांचे भान की शेतक-यांची अडचण?
कोकाटे यांच्या वक्तव्यावर समाजमाध्यमांतून आणि शेतकरी संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या स्पष्टपणाचे कौतुक केले, तर काहींनी ‘ढेकळांचे पंचनामे’ हे विधान शेतक-यांच्या भावना दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. पावसामुळे होणा-या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी शेतक-यांची अपेक्षा असताना, नियमांच्या चौकटीत अडकलेली शासकीय मदत आणि त्यावर कोकाटेंचे बिनधास्त मत या दोहोंमुळे राज्यात नव्या चर्चांना उधाण आले आहे.