25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रतपासाची गती देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न नाहीत

तपासाची गती देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न नाहीत

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली खंत
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली भेट
बीड : प्रतिनिधी
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी पीडित कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आज प्रथम पुण्यतिथीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीसह कुटुंबीयांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल सातत्याने नवीन अपडेट समोर आले पाहिजे आणि तपासाला गती मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा असताना तपासाची गती वाढविण्यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नाहीत, अशी खंत व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौ-यावर होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गतवर्षी निर्घृण हत्या झाली होती. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते. त्यांची आज पहिली पुण्यतिथी होते. याची माहिती अजित पवार यांना मिळताच त्यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधून नाराजी व्यक्त केली.

देशमुख कुटुंबीयांनी हत्या प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे न्याय मिळविण्यासाठी सतत झगडावे लागत आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात अनेकवेळा पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक गोष्टींचा गवगवा न करता, गोपनीय पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही.
दररोज अपडेट
मिळावे ही अपेक्षा
कुटुंबीयांची अपेक्षा आहे की त्यांना रोज काहीतरी नवीन अपडेट मिळावे, चौकशी कशा प्रकारे सुरू आहे, याची माहिती मिळावी. मात्र, प्रशासनाकडून तपासाची गती वाढवण्यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नसल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR