मुंबई : प्रतिनिधी
नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने तपोवनातील १८०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून नाशिकसह राज्यभरातून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये ‘साधुग्राम’ उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल १८०० झाडे तोडण्यात येणार आहेत.
या वृक्षतोडीला प्रचंड विरोध होत असून नाशिककर आणि पर्यावरणप्रेमींनी याविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. २९ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनीही या वृक्षतोडीला विरोध करून भाजप सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर आता राज ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध करत सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी साधुग्रामसाठी हजारो झाडे तोडण्याचे सरकारने ठरवले आहे.
याला नाशिककरांनी जनसुनावणीमध्ये प्रचंड विरोध केला. तरीही नाशिक महापालिका आणि सरकार तसेच सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हटायला तयार नाहीत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात आंदोलन सुरू केले आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार ट्वीट करत साधूंच्या आडून उद्योगपतींसाठी जमीन हडपण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे सरकारला सुनावले आहे. त्याचवेळी याविरोधात नाशिककरांनी यावे, असे आवाहन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात २९ नोव्हेंबर रोजी या समाज माध्यमावर पोस्ट टाकत, साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन टाकण्याचा संधिसाधूपणा सरकारने करू नये, असे सरकारला सुनावले आहे. मुळात तपोवनातील वृक्ष का तोडले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
यापूर्वी मनसेच्या हातात नाशिक महापालिका असताना नियोजन इतके उत्कृष्ट होते की तेव्हाच्या महापौरांचा, नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडे तोडावी लागली नाहीत. मग आता कुंभमेळ्यासाठी झाडे का तोडावी लागत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
सरकार उद्योगपतींचे दलाल
कुंभमेळ्याचे कारण सांगत झाडे तोडायची आणि साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून पुढे आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची, हाच विचार सरकारच्या मनात असणार! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरे काय सुरू आहे? जमिनी गिळणे नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणे हेच मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळे करताना दिसतायत, अशी खणखणीत टीका राज ठाकरे यांनी सत्ताधा-यांवर केली आहे.
सरकार म्हणते, तपोवनमधील जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या पाचपट झाडे दुसरीकडे लावली जातील. मग एवढे करण्यापेक्षा इथली झाडे तोडू नका आणि जिथे झाडे लावणार तिथे साधुग्राम बांधा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे, अशीच मागणी नाशिककर, पर्यावरणप्रेमी आणि उद्धव ठाकरे यांनीही केली आहे.

