25.9 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रतपोवनातील वृक्षतोडीविरुद्ध ठाकरे गट, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

तपोवनातील वृक्षतोडीविरुद्ध ठाकरे गट, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कविसंमेलनानेही वेधले लक्ष

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वृक्षतोडीविरोधात आक्रमक होत ३० नोव्हेंबर रोजी तपोवनात जोरदार आंदोलन करून सरकारचा निषेध केला आणि वृक्षतोडीला विरोध केला. तसेच वृक्षतोडीविरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केला. तर हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झालेल्या दिसल्या. त्यांनीही तपोवनातील वृक्षतोड होऊ देणार नाही, असे सरकारला खडसावून सांगितले तसेच येत्या निवडणुकीत नाशिककर धडा शिकवतील, असा इशाराही दिला.

रविवारी नाशिकच्या तपोवनात, तपोवन फक्त जंगल नाही तर तो नाशिकचा श्वास आहे, जपलं तर भविष्य हिरवं हिरवं… आणि तोडलं तर उद्याचं भविष्य भकास आहे… या काव्याने नाशिककरांचा आवाज घुमला. साधुग्रामसाठी तपोवनातील १८०० झाडे तोडू नयेत म्हणून येथे रोज आंदोलने, निषेध रॅली काढल्या जात आहेत. रविवारी ‘साहित्यकणा फाऊंडेशन, नाशिक’ यांनी तपोवनात कविसंमेलन आयोजित करून काव्याच्या माध्यमातून नाशिककरांच्या आवाजात आवाज मिळवला तसेच सरकार, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला काव्यातून खडे बोल सुनावले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी वृक्षतोडीचा घाट सरकार आणि नाशिक महापालिकेने घातला आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे, त्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर प्रदर्शन केंद्र, बॅक्वेट हॉल, रेस्टॉरंट उभारण्याच्या घाट घातला आहे. यासाठी तब्बल २२० कोटी रुपयांचे टेंडर नाशिक महापालिका प्रशासनाने काढले आहे. ३३ वर्षांसाठी इथली जागा बिल्डरला दिली जाणार असल्याचा आरोप आहे. यामुळे नाशिककर संतप्त झाले असून त्यांनी सरकारविरोधात संघर्ष उभा केला आहे. नाशिकमध्ये होणा-या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील तब्बल १८०० झाडे तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण, तपोवनातील झाडे ही नाशिककरांचा श्वास आहेत, या भूमिकेतून नाशिककरांनी ‘तपोवन वाचवा, नाशिक वाचवा’ अशी हाक दिली आहे. त्यामुळे आता सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

सर्वपक्षीय एकवटले
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वृक्षतोडीविरोधात वृक्षांना गमछे बांधले. विशेष म्हणजे वृक्षतोडीला विरोध वाढत असूनही मंत्री गिरीश महाजन फक्त शब्दांची फिरवाफिरव करण्यात दंग आहेत आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, याकडे सर्व लक्ष वेधत आहेत. त्यामुळे भाजपला धडा शिकवू, असा निर्धार सर्वपक्षीय नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी बोलून दाखवला.

सयाजी शिंदे यांचा इशारा
नाशिक महापालिकेने चिन्हांकित केलेली १८०० झाडे तोडली जाणार आहेत. याविरोधात आंदोलन आकार घेत असताना वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या तपोवनातील येण्यामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. एक जरी झाड तोडले तर १०० जणांचे बलिदान देऊ, असा इशारा सयाजी शिंदे यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR