मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात भूकंपाचे धक्के देणारी एक मोठी घडामोड आज घडली आहे. तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ दुराव्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पावले आज अखेर ‘मातोश्री’ या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानाकडे वळली आहेत. आपले चुलत भाऊ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. या भेटीमुळे केवळ ठाकरे कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आज सकाळपासूनच उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. त्यातच राज ठाकरेंचे ‘मातोश्री’वर आगमन झाले. यावेळी खा. संजय राऊत हे राज यांना उद्धव यांच्यापर्यंत घेऊन आले. राज यांनी उद्धव यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते. यावेळी ‘मातोश्री’वर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी या भेटीविषयी आनंद व्यक्त केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या कृतीने दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडल्याचे मानले जात आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनाच्या यशानंतर झालेल्या मेळाव्यात या दोन्ही बंधूंची भेट झाली होती. ती मोठी बातमी ठरली होती. तेव्हाही या दोघांच्या एकत्र येण्याने दोन्ही पक्षांत प्रचंड उत्साह दिसून आला होता. २००६ साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राज ठाकरे यांनी स्वत:च्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून ठाकरे कुटुंबात आणि विशेषत: या दोन भावांमध्ये एक राजकीय आणि भावनिक पोकळी निर्माण झाली होती.
अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आले असले तरी, राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ची पायरी चढणे हे गेल्या १८ वर्षांत घडले नव्हते. त्यामुळे आजची भेट ही केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित नसून, ती दोन भावांमधील दुरावा संपवणारी एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
‘मातोश्री’वर उत्साहाचे वातावरण
आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली आहे. राज्यभरातून आलेले नेते, कार्यकर्ते आणि चाहते आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी जमले आहेत. फुलांचे गुच्छ, हार आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. अशा या उत्साही वातावरणातच राज ठाकरे यांच्या आगमनाची बातमी आली आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या गाडीकडे लागल्या.

