लातूर : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथील दत्तात्रय सूर्यकांत कुंभार या २८ वर्षीय तरुणाने खासगी वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या कथित जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर खासगी वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीमुळे वाढणारा मानसिक ताण गंभीर प्रश्न बनला आहे, अशी प्रतिक्रिया लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून, कर्जवसुलीदरम्यान बेकायदेशीर दबाव किंवा मानसिक छळ झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, दिवंगत दत्तात्रय कुंभार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित वित्तीय संस्थेशी समन्वय साधून थकीत कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि कुटुंबीयांना पुढील काळात अनुचित कर्जवसुलीच्या त्रासापासून संरक्षण द्यावे, अशीही विनंती केली आहे.
दुष्काळ आणि आर्थिक विवंचनेमुळे कोणत्याही कुटुंबावर अशा प्रकारचे संकट ओढवू नये, यासाठी राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. मायक्रोफायनान्स कंपन्या व खासगी वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या पद्धतींवर प्रभावी देखरेख ठेवून, बेकायदेशीर वसुली आणि कर्जदारांच्या मानसिक छळाला आळा घालण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार डॉ. काळगे यांनी केली आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी, छोटे व्यावसायिक, विक्रेते आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मायक्रोफायनान्स कंपन्या व खासगी वित्तीय संस्थांकडून होणा-या कर्जवसुलीच्या कथित जाचाबाबत खासदार डॉ. काळगे यांनी या पूर्वीही पत्राद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. सदर पत्राची शासनाने वेळीच दखल घेऊन तात्काळ आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या, तर कदाचित ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, अशी खंत खासदार डॉ. काळगे यांनी व्यक्त केली.
















