लातूर : प्रतिनिधी
दयानंद शिक्षण संस्था संचलित, येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दि. ६ एप्रिल रोजी मायक्रोबायॉलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ताक’ या भारतीय पारंपरिक पेयाबद्दल सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्टिकोनातून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या मोहिमेचा मुख्य उद्देश हा, ताक या भारतीय पारंपरिक पेयाबद्यल आध्यात्मिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व सांगणे आणि पटवून देणे हा होता. ताकात प्रोबायोटिक्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आम्लपित्त कमी करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या मोहिमेचे अध्यक्षस्थान भूषवताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी ताक हे आरोग्यासाठी खूप लाभकारी आणि गुणकारी असून सर्वांनी रसायनयुक्त विदेशी पेय सोडून भारतीय पारंपरिक संस्कृतीतील ताक पिण्याची गरज आहे. ताक हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून, पचन सुधारणे, उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका टाळता येतो आणि शरीर थंड ठेवण्यासाठी उत्तम आहे, असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर आयक्यूएसी समन्वयक डॉ. जमन अंगुलवार यांनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ताकाला पृथ्वीतलावरील अमृत असे संबोधन करून सर्वांनी ते रोज सेवन करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रोहिणी शिंदे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. टी. एच. मुजावार यांनी देखील सहभाग नोंदवून मोहिमेस पाठींबा दिला.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राहुल मोरे यांनी मार्गदर्शन केले तर प्रास्ताविक सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर समन्वयक प्रा. शितल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन वैभवी साखरे हिने केले तर आभार डॉ. महेश करळे यांनी मानले. एम. एस्सी. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी भक्ती शिंदे यांनी सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्टिकोनातून ताकाचे महत्त्व सर्वांना सांगितले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डॉ. डी.डी. ढेरे, प्रा. एस. एस. धुतेकर, प्रा. एस. बी. टेकाळे, प्रा. ए. आर. इंगळे, प्रा. आर.एस. मालू, इंगळे, माधव सूर्यवंशी, अशोक मदने, एम. एस्सी. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या मोहिमेची सुरुवात सर्वांना ताक पिण्यास देऊन करण्यात आली.

