Homeसंपादकीयतात्पुरता युद्धविराम?

तात्पुरता युद्धविराम?

काही तासांपूर्वी ‘आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल’ अशी भीषण धमकी देणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर नरमाईची भूमिका घेतली. मध्य आशियातील वाढता तणाव पाहता, ट्रम्प यांनी इराणवर होणारी संभाव्य बॉम्बफेक किमान दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे मान्य केले. मध्यस्थांनी मांडलेला १४ दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव अमेरिकेने स्वीकारल्याने जगावर ओढवलेले युद्धाचे संकट तूर्तास टळले आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या निर्णयाची घोषणा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (आमचे ‘विश्वगुरू’ कोठे आहेत?) पाकिस्तानने केलेल्या विनंतीचा मान राखून आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली करण्याचे मान्य केल्यास अमेरिका पुढील दोन आठवडे कोणताही हल्ला करणार नाही. अमेरिकेने आपले लष्करी उद्दिष्ट आधीच साध्य केले असून इराणसोबत दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक १० कलमी प्रस्ताव प्राप्त झाला आहे असे ट्रम्प म्हणाले. हा प्रस्ताव चर्चेसाठी योग्य आधार असल्याचे अमेरिकेचे मत आहे. पुढील १४ दिवसांच्या कालावधीत अंतिम करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. इस्रायलनेही या युद्धविराम योजनेला पाठिंबा दिला असून ते देखील १४ दिवस आपले हल्ले थांबवणार आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करताच हा युद्धविराम लागू होईल, या घोषणेनंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

इराणच्या तीन वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे राजनैतिक प्रयत्न आणि चीनने शेवटच्या क्षणी इराणला लवचिक भूमिका घेण्याचे केलेले आवाहन यामुळे हा करार शक्य झाला आहे. इराणचे नवीन सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजताबा खामेनी यांनी या १४ दिवसांच्या युद्धविरामाला मंजुरी दिली आहे. काही काळापूर्वी अत्यंत आक्रमक भाष्य करणा-या ट्रम्प यांनी आता शांततेच्या मार्गावर चालण्याचे संकेत दिल्याने जागतिक स्तरावर सुटकेचा नि:श्वास सोडला जात आहे. गत काही दिवसांपासून जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या करणा-या अमेरिका आणि इराणमधील तणावात अखेर मोठी आणि सकारात्मक शिथिलता आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवर कोणतेही लष्करी हल्ले न करण्याची घोषणा करत तात्पुरती ‘शस्त्रसंधी’ जाहीर केली आहे. इराणने सादर केलेल्या १० कलमी शांतता तहाच्या प्रस्तावावर ट्रम्प यांनी सकारात्मक संकेत दिल्याने युद्धाचे सावट तूर्तास टळले आहे. या निर्णयाचे पडसाद जागतिक बाजारपेठेवर उमटले असून, धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत इराणवर अण्वस्त्रांचा प्रयोग होण्याची किंवा तिथली संस्कृती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

मात्र, शस्त्रसंधीच्या वृत्ताने बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे उधाण आले. बाजार उघडताच ‘प्री-ओपनिंग’ सत्रात सेन्सेक्सने तब्बल २७०० अंकांची ऐतिहासिक झेप घेतली. निफ्टीमध्ये ७५० अंकांची वाढ नोंदवण्यात आली. विशेषत: आयटी, मेटल आणि रिअ‍ॅल्टी क्षेत्रातील समभागांनी मोठी तेजी दर्शवली. अदानी पोर्ट आणि इंडिगो यासारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी पहावयास मिळाली. युद्ध थांबल्याच्या वृत्तामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली. तेलाचे दर १३ टक्क्यांनी कोसळून ९५ डॉलर प्रति बॅरलवर आले. इंधनाच्या दरात झालेली ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे. कारण यामुळे आयात खर्च कमी होऊन महागाईवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. युद्धाची दाहकता कमी झाली असली तरी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे पाहणा-यांचा ओघ वाढल्याने मौल्यवान धातूं्च्या किमतीत मोठी वाढ झाली. स्थानिक बाजारपेठेत जीएसटी व्यतिरिक्त सोन्याच्या भावात ३ हजार रुपयांची वाढ होऊन तो १ लाख ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळा या विक्रमी स्तरावर पोहोचला. चांदीच्या दरातही प्रति किलो १० हजार रुपयांची मोठी वाढ झाली.

सध्या चांदीचा दर २ लाख ४७ हजार रुपये प्रति किलो आहे. सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत शेअर बाजारात तेजी आल्याने बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत तीन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. बुधवारी रुपया प्रति डॉलर ९२.५४ वर स्थिरावला. तो त्याच्या मागील बंद भावापेक्षा ५२ पैशांनी अधिक होता. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा स्वीकार केला असून शुक्रवारी (आज) इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. युद्धविरामाचा हा प्रस्ताव एका व्यापक शांतता कराराचा पाया ठरू शकतो. दोन्ही देशांमधील जवळपास सर्व प्रमुख मुद्यांचे तत्त्वत: निराकरण करण्यात आले आहे. मात्र, इराणला युरेनियम समृद्ध करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अमेरिका इराणसोबत काम करेल. अमेरिका उपग्रहांच्या माध्यमातून इराणच्या अणुसाठ्यावर देखरेख ठेवून आहे. त्यामुळे कोणतीही हालचाल लपवून ठेवणे शक्य होणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हा युद्धविराम होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या अटीवर आधारित आहे.

ही सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. करारानुसार अमेरिका आणि इस्रायल आपले हल्ले थांबवतील. इराणही आपले हल्ले थांबवेल. या कालावधीत इराणी लष्कराच्या मदतीने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकर्स, वायू वाहतूक करणारी जहाजे आणि इतर नौकांची सुरक्षित आवक-जावक सुनिश्चित केली जाईल. युद्धविरामानंतरही भारताने सावध भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार संघर्ष सुरू होताना सुमारे ९ हजार भारतीय इराणमध्ये होते, ज्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश होता. आतापर्यंत सुमारे १८०० नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले असून उर्वरित लोकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे अनेक देशांसमोर इंधन संकट निर्माण झाले होते. या सा-या देशांना शस्त्रसंधीमुळे दिलासा मिळाला आहे. भारतात तब्बल सात वर्षांनी इराणमधून खनिज तेल येणार आहे. जागतिक स्तरावर मोठी घडामोड होत असताना ‘विश्वगुरू’ म्हणून स्वत:चीच पाठ थोपटून घेणारे मात्र कुठेच दिसत नाहीत. युद्ध थांबावे म्हणून पाकसह काही देश प्रयत्न करत असताना आमचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले होते- आम्ही शांततेसाठी प्रयत्न करणारे दलाल नाही!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR