26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeलातूरतालुका, जिल्हा, राज्यस्तरीय रब्बी हंगाम पीक स्पर्धा

तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय रब्बी हंगाम पीक स्पर्धा

लातूर : प्रतिनिधी
कृषी विभागामार्फत रब्बी हंगामा अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे. या स्पर्धेसाठी शेतक-यांनी ३१ डिसेंबरपर्यंत तालुका कृषी अधिका-यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटात ही स्पर्धा होईल.
रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व व जवस या पिकांसाठी पीक स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतक-याकडे स्वत:च्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये, आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतक-याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
अशी आहे बक्षिसांची रक्कम: रब्बी पीक स्पर्धेसाठी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ३ हजार रुपये आणि तृतीय बक्षीस २ हजार रुपयांचे राहील. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस १० हजार रुपये, द्वितीय बक्षीस ७ हजार रुपये आणि तिसरे बक्षीस ५ हजार रुपये राहील. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५० हजार रुपये, द्वितीय बक्षीस ४० हजार रुपये आणि तिसरे बक्षीस ३० हजार रुपये राहणार
आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR