जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी एका दिवसात तब्बल अडीचशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यानंतर दहा-बारा दिवस पावसाने उघडीप घेतली होती परंतु आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. जळकोट तालुक्यात रविवारी संध्याकाळी मेघगर्जनेसह तसेच विजेच्या कडकडाटासह तासभर मुसळधार पाऊस कोसळला. एका तासामध्ये संपूर्ण तालुक्यात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकट्या घोंणशी मंडळात तब्बल ७६ मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे घोंणशी मंडळात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आहे .
जळकोट तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांची पार वाट लागली आहे . यापूर्वी मूग पूर्णपणे हाताचे निघून गेले होते. आता उडीदही पूर्णपणे खराब झाले आहेत तसेच आता सोयाबीनमध्ये पाणी झाले असून असून शेंगा वाळत आहेत मात्र पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्याच्या १३ तारखेपासून जळकोट तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी संध्याकाळी जळकोट तालुक्यास पावसाने अक्षरश: झोडपून काढले. वादळी वारा तसेच विजांचा प्रचंड कडकडाट व मुसळधार पाऊस कोसळला. जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती खचून गेली आहे. यासोबतच अनेक शेतक-यांचा ऊसही आडवा पडलेला आहे. तसेच नद्या भरून वाहिल्या , यामुळे छोटे कालवे तसेच नदी यांच्या बाजूला असलेल्या शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्रीही मोठा पाऊस झाला. पत्राच्या पन्हाळ्यामध्ये पाणी बसत नव्हते एवढा मोठा पाऊस रविवार रात्री पडला.
जळकोट तालुक्यात या पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतक-यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले यासोबतच पिकांचेही नुकसान झाले आहे. असाच पाऊस पडत राहिला तर सोयाबीनही शेतक-यांच्या हातून जाणार आहे परत सोमवारी जळकोट तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला . यामुळे तालुक्यातील शेतक-यांची चिंता वाढली आहे.
















