जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ गत पाच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते परंतु दैनिक एकमतने दि १६ जून रोजी काम रखडल्यामुळे व धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयासंबंधीचे आजार बळावले या सदराखाली वृत्त प्रकाशित केले होते . या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांनी तिरुका गावाजवळ संत गतीने का होईना कामाला सुरुवात केली आहे तब्बल पाच वर्षानंतर रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाला वेळ मिळाला आहे .
नांदेड ते बिदर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाले. जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ तसेच कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा व मानसपुरी गावाजवळ या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण होते. यामुळे मोठ्या अडचणीचा सामना महामार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना करावा लागायचा . कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याचे काम करण्यात आले आहे तसेच मानसपुरी जवळचेही काम सुरू आहे परंतु जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ मात्र काम सुरू होत नव्हते. जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ नवीन पूल उभारण्यात आलेला आहे. नवीन पुलाकडील साईट पूर्णपणे बंद होती . तसेच जुन्या मार्गाचीही दुरुस्ती करण्यासही टाळाटाळ केली जात होती. . एक तर नवीन रस्ता सुरू केला जात नव्हता आणि जुना जो रस्ता आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. यानंतर या रस्त्याबाबत दैनिक एकमतने अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते.
राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पूल उभारण्यात आला होता परंतु अर्धवट कामामुळे लोखंडी गजाळ्या उघड्या होत्या यामुळे पाऊस तसेच वा-यामुळे हा पूलही कमकुवत होऊ लागला होता, यासोबतच तिरका गावाजवळ उड्डाणपुलाचे कामही अर्धवटच आहे या ठिकाणी दगड- गोटे मोठ्या प्रमाणात उघडे पडलेले आहेत. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यामुळे रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करावे अशी मागणी होत होती. अखेर पाच वर्षानंतर का होईना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने एका जेसीबीच्या सहायाने कामास प्रारंभ झाला आहे. कामामध्ये जे अडथळे होते तेही दूर झाले आहेत. सध्या पाच वर्षानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली आहे परंतु हे काम पूर्ण होण्यास जवळपास सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे .
यामुळे सहा महिने प्रवासी तसेच वाहनधारकांना खराब रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे. सध्या डोंगरगाव पाटी ते तिरुका गावापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. तिरू नदीवर असलेल्या जुना पुलावर गुडघ्या एवढा ले खड्डे पडलेले आहेत. पाणी साचून हा पूल कमकुवत बनला आहे. या पुलावरून अवजड वाहनेही प्रवास करत आहेत. पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे व खड्ड्याचा अंदाज येत नाही यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. नदीवरील पुलाचे कडे पूर्णपणे निघून गेलेले आहेत अशा स्थितीत जुन्या रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी सामान्य नागरिक तसेच प्रवासी करत आहेत.