जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर आला आहे. मंगळवारी सकाळी तिरुका येथील एक २७ वर्षीय युवक पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. त्याचा शोध प्रशासनाच्या वतीने सुरू आहे .
जळकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिरुका नजीक असलेल्या तीरू नदीला पूर आला आहे . जळकोट तालुक्यातील तिरुका येथील युवक सुदर्शन माधव घोणशेट्टे ( वय २७ ) हा चारा आणण्यासाठी मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास गेला होता . पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. गावक-यांनी तसेच नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु शोध लागला नाही. यानंतर प्रशासनाला याची माहिती देण्यात आली .
जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे हे घटनास्थळी पोहोचले आहेत. तिरूकापासून गव्हाण पर्यंत शोध घेतला जात असल्याची माहिती यावेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली. सदरील युवकाची माहिती मिळाल्यास प्रशासनास याची माहिती द्यावी असे आवाहनही राजेश लांडगे यांनी केले आहे. पुरात वाहून गेलेल्या सुदर्शनचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफला फोन केला असून त्यांना पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली .
















