पुणे : प्रतिनिधी
रोहित पवार यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरून एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत राज्य शासनाच्या ई-निविदा सूचनांची माहिती पाहायला मिळत आहे. यातच शेगाव व पंढरपूर पालखी दिंडी मार्गाचे काम करणा-या मे. मेघा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन केले आहे, त्यासोबतच त्यांनी लांबलचक कॅप्शन दिले आहे. तुमच्या भूमिका प्रामाणिक आहेत यात शंका नाही, पण त्या ‘सिलेक्टिव्ह’ असल्याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत. ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात विश्वास नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील विविध मूलभूत कामांसंदर्भात एक जाहीर सभा घेतली होती. या सभेत रोहित पवार एका अधिका-यावर चांगलेच संतापले होते. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर करत डिवचले होते. जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा?, असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला होता. आता यावरून रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमाताई अंधारे यांना आपण दिलेला हा रिप्लाय बघून केवळ गंमतच वाटली नाही तर काही शंका देखील दूर झाल्या, आपल्या भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत, ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात विश्वास नाही; पण तरीही
खालील प्रमुख तीन विषय पुराव्यासह आपल्या निदर्शनास आणून देतो-
१) आज राज्यातला शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी २० लाख रु. खर्च केले जातात हे योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी शेकडो कोटी रु. देऊन जाहिरातबाजी करणे योग्य आहे का?
२)मेघा इंजिनीअरिंग कंपनीने अवैध उत्खनन केले म्हणून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी ९५ कोटींचा दंड ठोठावून त्याचे साहित्य जप्त केले, परंतु महसूलमंत्र्यांनी मात्र केवळ १७ लाख रु. दंड भरण्यास सांगून जप्त केलेले साहित्य परत करण्याचे आदेश दिले, हे योग्य आहे का?
३)सिडकोची ५००० कोटी रुपयांची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी बेकायदेशीरपणे बिवलकर नावाच्या खाजगी व्यक्तीच्या घशात घातली. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे १२००० पानांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री याप्रकरणी भूमिका घेत नाहीत, हे योग्य आहे का?
या विषयांवर आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांबाबत शंका घेणा-यांचे गैरसमज दूर करावेत अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील..! आपणास शुभेच्छा..! असे रोहित पवार यांनी म्हटले.
















