नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (१५ मे) सुनावणी पार पडली. आजच्या या सुनावणीत सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी चांगलेचं सुनावले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. सुनावणीदरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्याने त्यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असे बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा,’’ असे सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान म्हटले. तसेच शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.
तीन वर्षांपासून याचिका प्रलंबित
शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २०२२ साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणा-या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
धनुष्यबाण वादाचा घटनाक्रम
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसह बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपच्या समर्थनाने नवीन सरकार स्थापन केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे नवीन चिन्ह देण्यात आले.
















