धाराशिव : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्रपूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक पुजा-यांनी केला आहे. ही तलवार मंदिर संस्थानाच्या खजाना खोलीतून गायब झाली आहे. दरम्यान, ही तलवार केवळ धार्मिकच नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्याकडून पूजा करून घेत शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकली आहे. तसेच होम-हवन करून तुळजाभवानीची शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचा दावाही पुजा-यांनी केला आहे. मंत्रोपचाराने देवीच्या ८ शस्त्रांतील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून देवीची तलवार गहाळ केल्याचा आरोपही पुजा-यांनी केला आहे. पुजा-यांच्या या दाव्यामुळे तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे.
तलवार खजिना खोलीतून नेमकी कशी गायब झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र गायब झालेली तलवार तात्काळ देवीच्या चरणी परत आणण्यात यावी, अशी मागणी पुजा-यांनी केली आहे.

