पणनमंत्र्यांची माहिती, शेतक-यांना मोठा दिलासा
मुंबई : प्रतिनिधी
शेतक-यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. तूर खरेदीसाठी ३१ मे तर हरभरा खरेदीला २९ मे २०२६ मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबतच हरभरा खरेदीच्या उद्दिष्टातही वाढ करण्यात आली असून त्यामुळे राज्यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या माहितीनुसार केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्य शासनाच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत २९ मे २०२६ पर्यंत वाढवून दिली. तसेच हरभरा खरेदीत ५८ हजार ६३२ मेट्रिक टनांची भर घालण्यात आली असून एकूण उद्दिष्ट आता ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टनांवर पोहोचले आहे. सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी ९० दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी ६० दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक शेतक-यांना आपला माल वेळेत विक्रीसाठी आणता आला नसल्याने मुदतवाढीची मागणी जोर धरत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मुदतवाढ मिळाली.
६ लाख ८२ हजार
३७ क्विंटल तूर खरेदी
किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत ३७ हजार ८०१ शेतक-यांकडून ६ लाख ८२ हजार ३७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे तर हरभरा खरेदीला १ मार्च २०२६ पासून सुरुवात झाली होती. आतापर्यंत ३ लाख ७ हजार ९७३ शेतक-यांकडून ७६ लाख १२ हजार ४९९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती पणनमंत्री रावल यांनी दिली.

