पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निकृष्ट दर्जाची कामे केल्याप्रकरणी एका सरकारी अधिका-याची चांगलीच खरडपट्टी केली आहे. यासंबंधीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात रोहित पवार यांनी सदर अधिका-याला तू काय गोट्या खेळत होता का? असे म्हणत चांगलाच समाचार घेतला आहे.
कर्जत जामखेड हा रोहित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील कामांविषयी ते नेहमीच जागरूक असतात. जामखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि चालू आर्थिक वर्षातील विकासकामांचे नियोजन करण्यासाठी त्यांनी नुकतीच एक आमसभा घेतली होती. या आमसभेत एका व्यक्तीने एका योजनेतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर रोहित पवार यांनी सदर विभागाच्या जबाबदार अधिका-याला बोलावले. त्या अधिका-याने या प्रकरणी उचलण्यात येणा-या पावलांची माहिती दिली. तसेच सदर कामावर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती केल्याचेही सांगितले. त्यावर तक्रारकर्त्यांनी आपल्या मोबाईलमधील कामांचे फोटोच दाखवले. ते पाहून रोहित पवार यांचा पारा चढला. त्यांनी थेट सदर अधिका-याची खरडपट्टी काढली.
जास्त अहंकार किंवा अॅटिट्यूड दाखवू नको
ते म्हणाले, ये, आत्तापर्यंत काय गोट्या खेळत होता का? हे फोटो दाखवणारे बावळट लोक आहेत का? ही काय वेडी लोकं आहेत का? खिशातला हात काढ आधी. मिजासखोर तू बोलू नको, मी तुला सांगतो. या लोकांनी दाखवलेले काम हे आमच्याकडे आलेले आहे. ते खराब क्वालिटीचे झाले आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही असशील, यांना इथे रहायचे आहे. त्यामुळे ही खराब कामे आहेत म्हणजे आहेत. या लोकांनी ती दाखवली आहेत.
जसा काका तसाच पुतण्या – दमानिया
दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी रोहित पवार यांच्या या व्हीडीओतील भाषेवर आक्षेप घेतला आहे. तसेच रोहित पवार हे त्यांचे चुलते अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकूनच मार्गक्रमण करत असल्याची अप्रत्यक्ष टीकाही केली. जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा? महाराष्ट्रात सरकारी कामे निकृष्ट असतात यात काहीच शंका नाही. यावर अधिका-यांना कडक शब्दांत जाब विचारला पाहिजे यातही काही शंका नाही, पण ही भाषा?
अधिका-यांना म्हणणं… काय गोट्या खेळत होता काय?, खिशातून हात काढ, मिजासखोर तू बोलू नकोस तुला सांगतोय, हे शब्द रोहित पवार लोकांदेखत अधिका-यांना बोलतात? ही कामे स्वत: पाहून त्या कामाची आणि त्या अधिका-याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणे योग्य आहे. पण सार्वजनिक अपमान करणं शोभतं का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
















