सोलापूर : प्रतिनिधी
बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. रवी राणा यांनी आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणची रक्कम ३ हजार करू मात्र, ज्या महिला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून १५०० परत घेणार असल्याचे म्हटले होते. रवी राणा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
सत्तेतील भाऊ काय म्हणतात बघा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांच्या व्हीडीओ क्लीपचा आवाज लोकांना ऐकवला. मी १५०० रुपये माघारी घेईन म्हणतात, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.
तुम्ही विचार करा माहेर जेव्हा सोडून सासरी जातो, तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, असे म्हणणारा भाऊ असतो. तोच भाऊ बहिणीला जर धमकी देणार असेल तर बघा मत नाही दिले ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे. मग आम्ही बहिणी परवडल्या. काही नको भावांनी प्रेम दिले यावरच आम्ही खुश असतो. नको बाबा तुझे १५०० रुपये, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
१५०० रुपये परत घेणा-या भावाला आदरपूर्वक प्रेमानं सांगायचे आहे की महाराष्ट्राच्या लेकीला धमकी दिली ना १५०० रुपये परत घेईन तर तू घेऊनच दाखव, बघते तुझा काय कार्यक्रम करते, ये नही चलेगा अशा कडक शब्दांत सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला.