20.5 C
Latur
Sunday, January 25, 2026
Homeअंतरराष्ट्रीय‘तोयबा’चे मुनीर यांना चॅलेंज; पाकिस्तानात सत्तांतराची चिन्हे

‘तोयबा’चे मुनीर यांना चॅलेंज; पाकिस्तानात सत्तांतराची चिन्हे

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तान सध्या अशा वळणावर उभा आहे जिथे त्याला शत्रूची गरज नाही. ज्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या लष्कराने आणि आयएसआयने भारताच्या विरोधात वापरण्यासाठी जन्म दिला, आता त्या संघटना खुद्द पाकिस्तानच्याच मुळावर उठल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा या खतरनाक संघटनेने आता पाकिस्तान सरकारला ‘चोर’ संबोधत उघडपणे बंडाचे निशाण फडकावले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये लष्करी सत्तापालट किंवा गृहयुद्धाची भीती निर्माण झाली आहे.

लष्कर-ए-तोयबाचा राजकीय मुखवटा असलेल्या ‘पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग’ने अलिकडच्या काळात आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत. या पक्षाचे नेतृत्व हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद पडद्यामागून करत आहे. या संघटनेचे कमांडर आता उघडपणे रॅली काढत असून पाकिस्तानच्या लोकशाही व्यवस्थेला आणि लष्करी नेतृत्वाला आव्हान देत आहे. लाहोरमध्ये झालेल्या एका मोठ्या मेळाव्यात लष्करचा कमांडर मोहम्मद अशफाक राणा याने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर कडक शब्दात टीका केली.

मोहम्मद अशफाक राणा याने पंजाब प्रांतातील परिस्थिती बलुचिस्तानसारखी अशांत करण्याचे संकेत दिले. ‘जर सरकारने आमचे ऐकले नाही, तर आम्ही पंजाबला बलुचिस्तान बनवू,’ अशी धमकी या दहशतवादी कमांडरने दिली आहे. हे विधान केवळ धमकी नसून, पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे काढणारे आहे.

दहशतवादी संघटनांचा सत्तापालटाचा प्लॅन?
पाकिस्तानातील सध्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यातच टीटीपी आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांचे बंड पाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जात आहे. जर असीम मुनीर यांनी या संघटनांना रोखले नाही, तर हे दहशतवादी गट लष्करातील काही असंतुष्ट अधिका-यांच्या मदतीने सत्तापालट घडवून आणू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ७ जानेवारी रोजी युक्रेन आणि रशियाच्या मुद्द्यावर जगाचे लक्ष असताना, पाकिस्तानच्या अंतर्गत यादवीने आशिया खंडातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR