पूर्णा : शहरात शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या देवराव बैबाजी साखरे (वय ४८) यांची अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. या खुनाच्या घटनेचा पूर्णाचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४ तासांत उलगडा केला असून दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या त्यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बेंद्रे यांनी तात्काळ तपास सुरू केला. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही तातडीने कामाला लागले. या दोन्ही पथकाच्या समन्वयातून अवघ्या काही तासांतच गणेश चांदोजी घोरपडे आणि रमेश पाराजी घोरपडे या दोन संशयितांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने जेरबंद केल्यामुळे परिसरात पो.नि. बेंद्रे आणि त्यांच्या सहका-यांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.
या प्रकरणी बैबाजी साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या शेतीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पो.नि. बेंद्रे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कामगिरीमुळे आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून या कामगिरीमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे.
















