नाशिक : नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याच्या दोन घटना समोर आल्या असून त्यांचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल झालेल्या एका व्हीडीओमध्ये दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून ढकलाढकली करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दिसते. संबंधित भाविकाचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. मंदिर परिसरात उपस्थित इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. दुस-या व्हीडीओमध्येही भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली आहे. या दोन्ही घटनांमुळे मंदिर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सध्या सलग सुट्या आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. हजारो भाविक सकाळपासूनच रांगेत उभे रहात असल्याने व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. मात्र गर्दीचे नियंत्रण करताना भाविकांशी गैरवर्तन होणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तर यापूर्वीही सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी उद्धट वर्तन आणि मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत.

