लातूर : प्रतिनिधी
शहरात वाढत चाललेल्या कडाक्याच्या थंडीमुळे बेघर, निराधार आणि गरजू नागरिकांचे हाल होत असताना वसुंधरा प्रतिष्ठानने पुढाकार घेत ‘मायेची शाल’ हा उपक्रम राबवून सामाजिक संवेदनशीलतेचे अप्रतिम दर्शन घडवले आहे. रस्त्यावर, फूटपाथवर, बसस्थानक परिसरात थंडीत थरथरणा-या नागरिकांना स्वत: जाऊन उबदार चादरी वाटत प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे केला.
वसुंधरा प्रतिष्ठानचे स्वयंसेवक मध्यरात्रीपर्यंत शहरातील विविध भागांत फिरून प्रत्यक्ष भेट देत चादरींचे वितरण करत आहेत. केवळ मदत देणे नव्हे तर त्या व्यक्तींशी संवाद साधून मायेची ऊब देणं—याला प्राधान्य देण्यात येत आहे. या उपक्रमात अनेक तरुण स्वयंसेवक उत्साहाने सहभागी होत आहेत. बसस्थानक परिसर, गाव भाग, गंजगोलाई, हनुमान चौक, औसा रोड, अशा अनेक ठिकाणी बेघरांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यात आला. थंडीत कुडकूडत जमिनीवर झोपलेल्या गरजूंच्या चेह-यावर चादरी मिळताच उमटलेलं समाधान हेच या उपक्रमाचं यश असल्याचे प्रतिष्ठानने सांगितले.
वसुंधरा प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, जनजागृती तसेच सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. ‘मायेची शाल’ हा उपक्रमही त्याच सामाजिक जबाबदारीची भावनिक जोड सांगणारा ठरला आहे. या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे किंवा मदत करायची आहे त्यांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. उपक्रमात प्रतिष्ठानचे प्रा. योगेश शर्मा, रामेश्वर बावळे, अमोल स्वामी, डॉ. अजित चिखलीकर, राहुल माशाळकर, गौस मणियार, शिवाजी निरमनाळे, संजय माकुडे, वैभव वाघ, विलास धावारे आदींनी सहभाग नोंदवला.

