लातूर : प्रतिनिधी
मालमत्ता कर वसुलीसाठी लातूर शहर महानगरपालिकेने अनेक वेळा कर सवलतीची योजना राबवली मात्र ब-याच मालमत्ताधारकांनी याकडे कानाडोळाच केला. त्यामुळे महानगरपालिकेने आता थेट धडक जप्ती मोहिमेला सुरवात केली आहे. त्याकरिता चार पथके नेमण्यात आली आहेत.
लातूर शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रलंबित मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मालमत्ता कराची दीर्घकाळ थकबाकी ठेवणा-या करदात्यांविरुद्ध कठोर पावले उचलून त्यांच्या मालमत्तांवर जप्ती व नळ खंडन कारवाई करण्यात येत आहे. गुरुवार अणि शुक्रवारदरम्यान महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय ‘सी’ अंतर्गत गंजगोलाई परिसरात तीन दुकाने जप्त करण्यात आले व आठ निवासी मालमत्तांचे नळ खंडन करण्यात आले. तसेच क्षेत्रीय करायला ‘ब’ व ‘ड’ अंतर्गत प्रत्येकी एक वाणिज्य मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालय ‘अ’ अंतर्गत जप्ती मोहिमेअंतर्गत दोन लक्ष चाळीस हजार चा धनादेश प्राप्त झाले आहे. थकीत कराच्या वसुलीसाठी मनपाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे जप्तीसारखी कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे.
















