लातूर : प्रतिनिधी
जिवनशैलीतील बदलामुळे मुख-दंत रोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अत्याधुनिक उपचार पध्दती आणि तंत्रज्ञानांच्या माध्यमातून वाढत्या दंत रोगांवर मात करणे शक्य आहे. गेल्या काही वर्षांत सौंदर्यविषयक दंतचिकित्सा क्षेत्रात तांत्रिक, वैज्ञानिक नवकल्पना वेगाने विकसीत होत आहेत. दंत शाखेतील बदलते आयाम लक्षात घेवून ‘दंत वेदांता २०२५’ ही परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून दंत शाखेतील नवकल्पना आणि तंत्रज्ञानात आणखी भर पडेल असा विश्वास प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे यांनी व्यक्त केला.
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय ‘दंत वेदांता २०२५’ पदवीपूर्व परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. कांगणे बोलत होते. यावेळी निरीक्षक डॉ. गणेश कोटलवार, उपप्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी, प्रमुख वक्ते कृत्रिम दंत रोपण तज्ज्ञ डॉ. सुशेन गांजरे, एण्डोडाँटिक तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश घुले, डॉ. अभिषेक बादाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौंदर्य दंतचिकित्सा: कला विज्ञान यांचा संगम या थीम आधारे परिषदेत सौंदर्यविषयक दंतचिकित्सा वाढवणा-या नवीनतम प्रगती, तंत्रे आणि तंत्रज्ञानावर सखोल माहितीचे आदान प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर प्रमुख वक्त्यांची व्याख्याने, प्रत्यक्ष कार्यशाळा, पेपर आणि पोस्टर सादरीकरणे आणि आघाडीच्या चिकित्सक आणि शिक्षणतज्ज्ञांसह परस्पर संवादी पॅनेल चर्चांसत्रांच्या माध्यमातून परिषदेत मंथन होणार आसल्याचे सांगून डॉ. कांगणे म्हणाले की, एस्थेटिक दंतचिकित्सा ही दंतचिकित्साची एक शाखा म्हणून परिभाषित केली जाते जी रुग्णाच्या हास्याचे स्वरूप आणि एकूण सौंदर्यशास्त्र सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते, दंतचिकित्साच्या भेटींबद्दलच्या धारणा भीती आणि वेदनांपासून सौंदर्य, तारुण्य आणि कार्यक्षमता वाढवणा-या कलेच्या स्वरूपात रूपांतरित करते.
या कार्यशाळेत डॉ. सुशेन गांजरे यांनी ‘सिरेमिक एस्थेटिक मॅक्सिमा’ विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. ऋषिकेश घुले यांनी ‘कंपोझिट व्हेनियर्स इंजेक्टेबल आणि प्रेडिक्टेबल पध्दत’ विषयावर तर डॉ. अभिषेक बादाडे यांनी ‘व्हाइट एस्थेटिक लेसर व्दारे दात पांढरे करण्याची पध्दत’ विषयावर उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्रेहा गणमुखी व डॉ. स्वातीलक्ष्मी नायर यांनी केले तर आभार डॉ. गौरी उगीले यांनी मानले. या कार्यशाळेसाठी राज्यभरातील दंत महाविद्यालयातील पदवीपूर्व विद्यार्थी, दंत चिकित्सक व एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील विभाग प्रमुख, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते.

