21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रदक्षिण नागपूरसह हिंगणा मतदारसंघात मनसेचा भाजपला पाठिंबा

दक्षिण नागपूरसह हिंगणा मतदारसंघात मनसेचा भाजपला पाठिंबा

नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात आजपासून सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
त्याच अनुषंगाने आज काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नागपूरच्या दौ-यावर आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या दोन मतदारसंघांत मनसेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे.

दक्षिण नागपूर आणि हिंगणा विधानसभेत मनसेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर दोन्ही उमेदवारांनी आपला पाठिंबा भाजप उमेदवाराला दिला आहे. त्यामुळे दक्षिण नागपूर आणि हिंगणामध्ये मनसेच्या पाठिंब्याने भाजपचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाल्याचे बोलले जात आहे.

दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात भाजपने मोहन मते यांना सलग दुस-यांदा संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर गिरीश पांडव यांनाही काँग्रेसने सलग दुस-यांदा मोहन मते यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवत आव्हान दिले आहे. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या लढतीत मोहन मते यांचा फार कमी मताधिक्याने विजय झाला होता. त्यामुळे यंदा ही लढाई अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनुप दुरूगकर यांना संधी देत मैदानात उतरवले होते. मात्र आज राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अनुप दुरूगकर या मनसेच्या उमेदवाराने आपला पाठिंबा भाजप उमेदवाराला दिला आहे. त्यामुळे दक्षिण नागपूरमध्ये भाजपला अधिक बळ मिळाल्याचे चित्र आहे.

समीर मेघेंना मनसेचा पाठिंबा
तर दुसरीकडे हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार समीर मेघे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रमेशचंद बंग आणि बसपाकडून डॉ. देवेंद्र कैकाडे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान या तिरंगी लढतीत मनसेने बिजाराम किनकर यांना मैदानात उतरवत ही लढत अधिक रंगतदार केली. दरम्यान याही मतदारसंघात मनसेचे उमेदवार बिजाराम किनकर यांनी आपला पाठिंबा भाजप उमेदवार समीर मेघे यांना दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR