शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
पावसाळा संपताच नद्या-नाले कोरडे पडू लागतात आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होते. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मांजरा, घरणी, कोटकसर, लेंडी नद्यांसह विविध लहान-मोठ्या ओढ्यांवर दारे नसलेले छोटे दगडी बंधारे उभारण्याची गरज आहे. कमी खर्चात भूजलपातळी वाढविण्याची क्षमता असलेल्या या उपाययोजनेला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्राधान्य दिल्यास तालुक्याच्या जलसमृद्धीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
तालुक्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर नदी-नाल्यांतून वाहून जाते. हे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी योग्य ठिकाणी दगडी बंधा-यांची साखळी उभारणे हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. सिमेंट-काँक्रीटच्या महागड्या बांधकामांऐवजी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करून कमी खर्चात जलसंधारणाची कामे करता येऊ शकतात. अशा बंधा-यांची उभारणी केल्यास स्थानिक मजुरांनाही रोजगार मिळू शकतो. नदी आणि ओढ्यांच्या पात्रात ठरावीक अंतरावर दगडी बंधारे उभारल्यास पाण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत सुधारणा होण्याची शक्यता वाढते. जमिनीतील ओलावा टिकून राहिल्याने पिकांना दिलासा मिळू शकतो. पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे मातीची धूप रोखण्यासही मदत होते.
















