अहिल्यानगर : प्रतिनिधी
नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर २० जुलै रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला. एकीकडे दिल्लीत सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातही अण्णा हजारेंनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, असा संदेश अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे.
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांनी सकाळी अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाआधी त्यांनी सरकारकडून दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, अशी भूमिका बॅनरच्या मार्फत स्पष्ट केली. सरकारने संवाद साधून प्रश्न सोडवायला हवेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे आवाहन देखील केले. यावेळी आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात ‘नगरचे जंतर-मंतर’ नाव दिल्याचे जाहीर केले. अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन चर्चेत आले आहे.
या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांच्या डोळ्यांत अश्रू देखील आले. अण्णा हजारे यांनी आंदोलनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले. अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सरकारच्या दडपशाहीविषयी चिंता व्यक्त केली. अण्णा हजारे यांनी म्हटले की, ‘नीट पेपरफुटी, बेरोजगारी, भरती प्रक्रियांवरून चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे आंदोलन हे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हे. तर लोकभावनेचा विषय म्हणून पाहिले पाहिजे. सरकारने विद्यार्थी आणि आंदोलकांशी संवाद करावा, असे म्हणत त्यांनी लोकशाही मूल्याची आठवण करून दिली’. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे विरोधकांसहित विरोधकांचेही लक्ष असणार आहे.
















