लातूर : प्रतिनिधी
जागतिक पुस्तक दिनानिमित्त दयानंद कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष ग्रंथालय भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि ग्रंथालयाशी त्यांचा अधिक जवळचा संबंध प्रस्थापित करणे हा होता. दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जाणारा जागतिक पुस्तक दिन हा दिवस वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २३ एप्रिल हा दिवस विल्यम शेक्सपियर, आणि इंका गार्सिलासो दे ला वेगा यांसारख्या महान साहित्यिकांच्या स्मृतीशी संबंधित असल्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
ग्रंथालय भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भग्रंथ, नियतकालिके यांची माहिती देण्यात आली. तसेच ग्रंथालयातील उपलब्ध सुविधा, वाचन पद्धती आणि संदर्भ शोधण्याच्या तंत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध पुस्तकांचे अवलोकन केले आणि वाचनाविषयी आपली आवड व्यक्त केली.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत, ‘वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाची किल्ली असून ज्ञान, विचारसंपदा आणि सर्जनशीलता वाढविण्याचे प्रभावी साधन आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी दररोज थोडा वेळ वाचनासाठी द्यावा आणि ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी यांनी उत्कृष्ट वाचन करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिक जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. दिनेश जोशी, डॉ. सुधीर गाडवे, प्रा. दशरथ ननावरे, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. मनोज गवरे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उंची प्राप्त झाली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रंथपाल डॉ. अपर्णा पसाररकर, श्रीकांत जोशी आणि गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

