लातूर : प्रतिनिधी
बदलत्या शैक्षणिक प्रवाहात शिक्षकांनी केवळ विषयज्ञानापुरते मर्यादित न राहता स्वत:च्या विचारपद्धतीत, अध्यापनशैलीत आणि मानसिकतेत सातत्याने सकारात्मक बदल घडवणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर दयानंद शिक्षण संस्था संचालित दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने शिक्षकांसाठी ‘मेंटल अपग्रेड : ग्रोथ माइंडसेट इन टीचिंग’ या विषयावर समुपदेशन सत्राचे आयोजन मंगळवारी करण्यात आले.
या सत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ट्रेनर वैशाली शेठ-चापसी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अध्यापन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, सातत्याने शिकण्याची तयारी, नव्या संकल्पना आत्मसात करण्याची वृत्ती आणि बदल स्वीकारण्याची मानसिकता अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांचा ग्रोथ माइंडसेट सक्षम असेल, तर विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान अधिक प्रभावी, प्रेरणादायी आणि परिणामकारक पद्धतीने पोहोचू शकते, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने,आयक्यूएसी समन्वयक डॉ. बाळासाहेब चव्हाण, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. मनिषा आष्टेकर, बीसीए विभाग प्रमुख डॉ. शशिकांत स्वामी, बीबीए विभाग प्रमुख डॉ. वैशाली सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आकांक्षा भांजी यांनी केले, तर डॉ. अनुजा कांबळे यांनी आभार मानले. या समुपदेशन सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. लक्ष्मीकांत सोनी, डॉ. खदीर शेख, डॉ. प्रेमसागर मुंदडा आणि प्रा. लहू शेंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
















