श्रीनगर : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानी सैन्यांत चार दिवस भीषण चकमक झाली, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. दरम्यान, आता श्रीनगरमधील दल सरोवरात पाकिस्तानी क्षेपणास्त्राचा तुटलेला तुकडा सापडला आहे.
दल सरोवराच्या नियमित स्वच्छतेदरम्यान सरोवर संरक्षण व व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कर्मचा-यांना क्षेपणास्त्राचा तुकडा सापडला. हा तुकडा ऑपरेशन सिंदूरदरम्यान फुटलेल्या पाकिस्तानी क्षेपणास्त्राचा असल्याचे मानले जात आहे. कर्मचा-यांनी लगेच हे तुकडे तपासणी आणि पुढील कारवाईसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केले आहेत.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान १० मे रोजी श्रीनगरमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. त्यावेळी एक क्षेपणास्त्रासारखी वस्तू दल सरोवरात कोसळली होती. अधिका-यांच्या माहितीनुसार, ही वस्तू पाण्यात पडताच सरोवराच्या पृष्ठभागावर धूर पसरला होता. आता या सरोवराची स्वच्छता सुरू असताना, हाच तुकडा सापडला आहे.
















