28.1 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रदळवी ‘देशभक्त’ तर तटकरे ‘संत’

दळवी ‘देशभक्त’ तर तटकरे ‘संत’

दानवेंच्या कॅश बॉम्बवरून शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

नागपूर : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (९ डिसेंबर) टाकलेल्या कॅश बॉम्बचे सलग दुस-या दिवशीही १० डिसेंबर रोजी उमटत आहेत. यानंतर आरोपीच्या पिंज-यात उभे केलेले अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी दानवेंचे आरोप फेटाळले तसेच व्हीडीओ मॉर्फ केल्याचा आरोप केला.

तसेच शिवसेनेकडून अलिबागमध्ये दानवे यांचा निषेध करण्यात आला. त्याचवेळी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी या व्हीडीओमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तटकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळला होता. मात्र, १० डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंनी पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत.

हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुस-याच दिवशी (९ डिसेंबर) अंबादास दानवे यांनी व्हीडीओ ट्वीट करत त्यात पैशांची बंडले, शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि लाल रंगाचा टी-शर्ट घातलेली (चेहरा दाखवला नाही) व्यक्ती दाखवली. यावरून राज्यात खळबळ उडाली. हे पैसे कुणाचे, सरकारकडे शेतक-यांना द्यायला पैसे नाहीत मग आमदारांकडे पैशांची बंडले कुठून आली, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यामुळे अधिवेशनातील वातावरणही ऐन थंडीत गरम झाले होते. यावरून आमदार दळवी यांनी हा व्हीडीओ त्यांचा नसल्याचा दावा केलाच शिवाय कटामागे सुनील तटकरे असल्याचा आरोपही केला होता. रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. दोन्हीकडून कायम एकमेकांवर आरोपांचे बाण सोडले जातात.

दानवे यांच्या ट्वीटनंतर हे व्हीडीओ खोटे असून आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडू, अशी आव्हानाची भाषा आमदार दळवींनी केली तर राजकारण सोडू नका, व्हीडीओत दिसणारे तुम्हीच आहात का, असा थेट सवाल केला होता. यानंतर दळवी-थोरवेंच्या आरोपांना उत्तर देत याच्याशी काहीही संबंध नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले होते. तसेच या संदर्भात महेंद्र दळवी यांच्या व्हीडीओची मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय आमदार महेंद्र दळवी निरागस आहेत, देशभक्त असल्याचा उपरोधिक टोलाही लगावला. एवढेच नाही तर शक्य असेल तर मुख्यमंत्र्यांनी ३०२ चा गुन्हा देखील दाखल करावा, अशी मागणी सुनील तटकरे यांनी केली.

सुनील तटकरे हे राजकारणातील संत आहेत, असा प्रतिटोला आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंच्या टोल्यावर लगावला आहे. तटकरे आक्षेपार्ह बोलतात. महाराष्ट्रात महायुतीत जी काही दुही माजली आहे त्याचे कर्ते करविते सुनील तटकरे हेच आहेत, असा थेट आरोप आमदार दळवी यांनी केला आहे. शिवाय तटकरेंनी व्हीडीओच्या चौकशीची मागणी केली असेल तर स्वागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी दानवे यांनी ट्वीट केलेला व्हीडीओ तटकरे यांनीच दिल्याच्या आरोपावर महेंद्र दळवी ठाम राहिले आहेत.

सध्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे कुठले काम उरलेले नाही. म्हणूनच ‘मातोश्री’ आणि उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी ते असे काम करत आहेत. दानवेंकडे अजून कुठले फोटो, व्हीडीओ असतील तर त्यांनी कुठेही यावे, त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे आव्हान आमदार दळवींनी दिले आहे. त्याचवेळी अंबादास दानवे यांना आमदारकीचे डोहाळे लागल्याचा आरोपही केला. शिवाय त्या व्हीडीओमध्ये जराही खरेपणा असेल तर राजीनामा द्यायला तयार असल्याचेही आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR