यंगून : वृत्तसंस्था
दरवर्षी दहशतवादाचा बळी महिला आणि लहान मुले ठरत असतात. परंतू आता एका लहानग्या मुलीलाच अतिरेकी म्हणून तुरुंगात डांबल्याचे उघडकीस आले आहे. ब्रह्मदेशात हा विचित्र प्रकार घडला आहे. येथे एका सहा वर्षांच्या मुलीला अतिरेकी ठरवून अटक करण्यात आली आहे. या मुलीवर निवृत्त आर्मी जनरलच्या हत्येत सहभाग घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वास्तविक निवृत्त आर्मी जनरल यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्याची ती मुलगी आहे. मान्यमार आर्मीने एकूण १६ लोकांना अटक केली. २०२१ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर शेकडो मुलांना अटक करण्यात आली असल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे. २२ मे रोजी यंगून मध्ये ६८ वर्षाचे रिटायर्ड ब्रिगेडियर जनरल आणि राजकारणी तुन आंग यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
गोल्डन व्हॅली वॉरियर्स नावाच्या एका बंडखोर संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही संघटना आर्मीच्या विरोधात सक्रीय आहे. त्यांचा दावा आहे की चो तुन आंग सातत्याने आर्मीच्या दमनशाही मोहिमाचे समर्थन करत होते. खास करुन सर्वसामान्य नागरिकांना ते त्रास देत होते. त्यासाठी त्यांना लक्ष्य करण्यात आले. मान्यमारच्या आर्मीने या संघटनेला अतिरेकी संघटना म्हणून घोषीत केले आहे.
२०२१ च्या आर्मीने सरकार उलटवल्यानंतर म्यानमार येथील स्थिती खूपच तणावपूर्ण झाली आहे. सर्व साधारण निवडणुकांनंतर निवडून आलेल्या सरकारला हटवून आर्मीने सरकार ताब्यात घेतले आहे. त्यानंतर देशात सिव्हील वॉर सारखी परिस्थिती आहे. विरोध करणा-या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना तुरुंगात डांबले जात आहे. एक स्वतंत्र संस्था अअढढच्या मते आतापर्यंत ६०० हून अधिक मुलांना अटक करण्यात आली आहे. सुमारे ६,७०० सर्वसामान्य नागरिकांना ठार केले गेले आहे.