छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात डीजेबंदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात प्रथम डीजेबंदीची मागणी केल्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यांत मागणीचा सूर पसरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात डीजेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता इतरही जिल्ह्यांत मागणी केली जात आहे. त्यात दहीहंडी उत्सवात काही आयोजकांच्या स्टेजवर डान्सर नाचल्या होत्या. त्यावरून जोरदार टीका होत आहे. यावरून आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे.
संभाजी भिंडे यांनी टाकळीतून माध्यमांशी संवाद साधला. संभाजी भिडे म्हणाले, ‘डीजे आणि डॉल्बी फेकून दिले पाहिजे. त्याचा काय फायदा, त्यातून देशाला काय मिळते. काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्यात डॉल्बी आहे. सणामध्ये अश्लील डान्स करणारे, बायका नाचवणे, असले प्रकार करणारे मूर्ख आहेत. देशद्रोही आहेत. हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, डॉल्बी फेकून दिले पाहिजेत. दहीहंडी सणांमध्ये बायका नाचवणारे देशद्रोही आहेत. त्यांनी चुकीचे काम केले आहे’. संभाजी भिडे यांनीही आता डीजेबंदी विरोधात भूमिका घेतली आहे.
















