सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ
मुंबई : प्रतिनिधी
देशातील वाढत्या महागाईचा मोठा फटका थेट सलून व्यवसायालाही बसला आहे. वाढते इंधनाचे दर, महाग झालेली आंतरराष्ट्रीय व स्थानिक सौंदर्यप्रसाधने आणि वाढलेला दैनंदिन व्यवसाय खर्च यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून सेवांच्या दरात तब्बल २० टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला. नाभिक महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार ही नवीन दरवाढ ६ जूनपासून संपूर्ण राज्यभरात अधिकृतपणे लागू होणार आहे.
वाढत्या महागाईत आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक होते, असे स्पष्टीकरण नाभिक महामंडळाकडून देण्यात आले. त्यामुळे आता केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल आणि इतर सर्व अत्याधुनिक सलून सेवांसाठी ग्राहकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. शॅम्पू, हेअर कलर, जेल, वॅक्स यांसारख्या दैनंदिन लागणा-या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सलून व्यावसायिकांवरील आर्थिक ताण कमालीचा वाढला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
















