निलंगा : प्रतिनिधी
मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी दादगी (ता. निलंगा) येथे कोळी महादेव समाजाचा एल्गार मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी दि १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली हा एल्गार मेळावा झाला. या मेळाव्यात आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी यांना १९५० पूर्वीचा ‘कोळी’ नोंदीचा रहिवासी पुरावा ग्रा धरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे यासह विविध मागण्यासाठी विविध स्तरावर आंदोलने केली आहेत अद्यापपावेतो कार्यवाही झालेली नाही. मराठवाड्यातील मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी, मराठा-कणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला आहे. तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीसाठी लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण नाही झाल्यास १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
















