मुंबई : प्रतिनिधी
कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (१३ ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच आंदोलनाच्या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या या नोटिसांनंतरही दादर कबुतरखाना परिसरात आंदोलक जमायला सुरुवात झाली. यानंतर पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे. यावेळी हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून दादर कबुतरखाना प्रकरणी चुप्पी पाहायला मिळाली.
दादरचा कबुतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे तसेच कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दादर कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. पोलिसांच्या या नोटिसीनंतरही कबुतरखान्याजवळ सकाळी ११ नंतर आंदोलक जमण्यास सुरुवात झाले. यानंतर तात्काळ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला-
कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (१३ ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीने उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने मुस्कटदाबी होत असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला आहे.

