भविष्यात काय होणार ते माणसाला कधीच कळत नाही. राजकारण वाईट आहे, राजकारणात पडू नका, धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा असा लोकांना सल्ला देणारे, रोखठोक बोलणारे, मिश्किल स्वभावाचे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे नेते अजित पवार आज जगात नाहीत यावर विश्वास बसत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने बारामतीकडे निघालेल्या अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला. ज्या बारामतीतून अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली, त्याच बारामतीत अजित पवारांचे अकाली निधन होणे हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल. अत्यंत कार्यक्षम पण वादग्रस्त नेत्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
अत्यंत कार्यक्षम आणि परखड स्वभावाचा नेता म्हणून अजित पवारांची महाराष्ट्राला ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जरी काका शरद पवार यांच्या छत्रछायेखाली झाली असली तरी त्यांनी लवकरच आपले स्वतंत्र राजकीय कर्तृत्व दाखवण्यास सुरुवात केली. दहावीपर्यंतचेच शिक्षण असूनसुद्धा आपल्या राजकीय बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी राज्यातले अनेक प्रश्न समजून घेतले. मंत्रिमंडळातील अनेक खात्यांचा अभ्यास करून त्या खात्यातील खाचाखोचा व्यवस्थित समजून घेतल्या. त्यामुळे त्यांना प्रशासनावर उत्तम मांड ठोकता आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण तयारी करून येणारा मंत्री अशी त्यांची ख्याती होती. अजित पवार १९९१ मध्ये बारामतीतून खासदार झाले परंतु शरद पवार संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी बारामती लोकसभेची जागा सोडली आणि ते बारामतीतूनच आमदार झाले. सुरुवातीची काही वर्षे ते आमदार होते,
नंतर ते सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. त्यांनी जलसंपदासह वेगवेगळी खाती सांभाळली. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षनेते पद सोडले तर अजित पवार कायम ‘सत्ताधारी’ राहिले. नुसते विरोधाचे तात्त्विक राजकारण करून चालणार नाही, समाजसेवा करायची असेल तर सत्ता पाहिजे, सत्तेशिवाय समाजसेवा नाही, हे यशवंतराव चव्हाण यांनी दिलेले राजकीय सूत्र शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवारांनी अधिक पाळले. त्यामुळे त्यांनी तब्बल चार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपद सांभाळले. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस या चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात ते उपमुख्यमंत्रिपदावर होते. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात जलसंपदा या विषयावरून गंभीर मतभेद झाले. जलसंपदा खात्यावर ७० हजार कोटी रुपये खर्च करून सुद्धा १ टक्काच सिंचन होऊ शकले. त्यावेळी अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा पहिल्यांदा आरोप झाला.
त्या आरोपावरून त्यांची शेवटपर्यंत सुटका झाली नाही. याशिवाय राज्य सहकारी बँकेतील ४५० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचाही त्यांच्यावर आरोप झाला. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतले. त्याबद्दल भाजपवर नेहमीच टीका होत राहिली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले. परंतु त्यासाठी अजित पवारांना आपल्या काकांचा राष्ट्रवादी पक्ष फोडावा लागला. प्रारंभी अजित पवार शरद पवारांच्या छत्रछायेखाली असले तरी त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली. शरद पवारांच्या राजकीय वारसाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा हा वारसा सुप्रिया सुळे यांनाच मिळणार हे लक्षात आल्यानंतर अजित पवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. पुत्र पार्थ पवारच्या मुंढवा कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणीही अजित पवारांच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली. अत्यंत कार्यक्षम मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार वावरले परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची कारकीर्द नेहमीच काळवंडली.
विकासकामांसाठी १६-१६ तास काम करणारे नेते अशी त्यांची ओळख होती. एखादी चूक घडली तर त्याबद्दल माफी मागण्याचा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. दुष्काळातील पाणीटंचाईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याबद्दल त्यांनी लगेच माफी मागितली होती. मिश्किल बोलण्यासाठी ते प्रसिद्ध होते. एका सभेत बोलत असताना प्रेक्षकांतून एक जण ओरडला, दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का? त्यावर क्षणभर थांबत अजित दादा म्हणाले, तुझ्या तोंडात साखर पडो! आता त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे एक उदाहरण- तुमच्या दृष्टीने सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर अजित पवार क्षणार्धात म्हणाले, विलासराव देशमुख! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी ही हिम्मत दाखवली! राज्याच्या राजकारणात अजित पवार असे नेते होते की ज्यांच्या घड्याळाच्या काट्यावर प्रशासन धावायचे. त्यांच्या शब्दाला वजन होते आणि ‘पहाटेची कामाची वेळ’ ही त्यांनी आपली ओळख बनवली होती. भल्या पहाटेच त्यांच्या कामाची सुरुवात व्हायची. बारामतीच्या मातीत झालेला अपघात एका विमानाचा अपघात नव्हता तर तो राज्याच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अकाली अस्त होता. अजित पवार म्हणजे केवळ एक राजकीय नाव नव्हते, तर ती एक कार्यपद्धती होती.
पहाटे ५ वाजता कामाला सुरुवात करून प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणारा हा लोकनेता शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या कामासाठीच धावत होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते बारामतीकडे निघाले होते, परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाड झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. गत साडेचार दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव केंद्रस्थानी होते. शरद पवारांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय नेहमीच चर्चेत राहिले. स्पष्टवक्तेपणा आणि तडफदार कार्यशैली ही त्यांची दोन प्रमुख शस्त्रे होती. अजितदादांना ‘एकमत’ची भावपूर्ण श्रद्धांजली.

