पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. या घटनेला आता ५ महिने होत आहेत.
यानंतर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘दादा मिस यू’ असे कॅप्शन लिहित पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांच्यासोबतचा एक खास फोटोही असून त्यांची आठवण शेअर केली आहे. पोस्टमुळे कार्यकर्ते आणि समर्थकही भावूक झाले असून सोशल मीडियावर या पोस्टची मोठी चर्चा रंगली आहे. याचवेळी ‘दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!’ अशा एका पोस्टने मात्र राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली असून जी अजित दादांचे विश्वासू सलीम सारंग यांनी केली आहे. सारंग यांच्या भावनिक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे अजितदादांच्या विमान अपघाताला पाच महिने होत असून अद्याप तपासाबाबत कोणतीच माहिती उघड होताना दिसत नाही. यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या या फेसबुक पोस्टने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. सलीम सारंग यांनी ‘दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!’ अशी पोस्ट केल्याने राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चांना वेग आला आहे.
सलीम सारंग यांनी, दादा, तुमच्या जाण्याने मला फरक पडलाय! आज तुम्हाला जाऊन पाच महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकत आहे, पण तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र दिवसेंदिवस अधिक जाणवत असल्याचे म्हटले आहे. तर दादा, तुम्ही आमच्यासाठी फक्त पक्षाचे नेते नव्हतात, तर कार्यकर्त्यांचा विश्वास होतात. कोणतीही अडचण आली की, आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही विनंतीची गरज नव्हती. मात्र आता स्वत:ची ओळख सांगावी लागते, भेटीसाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागते, अनेकदा विनंती करावी लागते आणि एवढं करूनही उत्तर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
















