21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्र दानवेंची लेक भर सभेत ढसाढसा रडली

 दानवेंची लेक भर सभेत ढसाढसा रडली

   छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
  माझ्यावर अनेक संकटे आली, पण मी बोलून नाही दाखवले. लग्नानंतर एखादं मूल झालं की नवरा सुधारेल अशा अपेक्षेने मी सहन करत गेले. त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही, पण त्याचा माझ्या वडिलांना खूप त्रास झाला, मुलीचा बाप होता म्हणून तो शांत बसला, असे म्हणत रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना दानवे यांना भर सभेत हुंदका अनावर झाला.
 दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची लेक संजना जाधव या यंदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून त्या निवडणूक लढवत आहेत.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता, मात्र मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात अनेक वादविवाद होऊन अनेक अडचणी आल्या. हर्षवर्धन जाधव यांनी याबद्दल फेसबुक लाईव्हमधून अनेकदा बोलून दाखवलं. मात्र संजना जाधव पहिल्यांदाच याबद्दल बोलल्या आहेत. मुलीचा बाप आहे म्हणून माझा बाप शांत बसला… असं म्हणत संजना जाधव या ढसाढसा रडल्या. मागच्या काही वर्षांमध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या.
  पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांवर आरोप झाले, आम्ही सहन केले. एखाद्या मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता, पण माझा बाप एका मुलीचा बाप आहे म्हणून तो शांत बसला…प्रत्येक आई-वडील आपल्यावर एकच संस्कार करतात, माझ्या आईने मला सांगितलं होतं की, आज तू माझ्या घरातून जातेय, जेव्हा तू येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे. आतापर्यंत मी कधी रडले नाही, पण आज मला भरून आलं, कारण हे गाव माझं आहे आणि इथल्या लोकांना माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं. मी काय आहे हे जनतेला माहिती आहे. तुम्ही मला संघर्षकन्या नाव दिलं. पण आता संघर्ष करण्याची ताकद संपली. मला यातून तुम्हीच बाहेर काढू शकता, असे आवाहन उपस्थितांना केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR