अकोला : प्रतिनिधी
गावात सर्रासपणे होत असलेल्या दारू विक्रीला त्रासलेल्या महिलांनी आज रौद्र रूप धारण करत या विरोधात एल्गार पुकारला होता. गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांनी प्रचंड राडा केला. यात महिलांनी एकत्रित येत गावात दारू विक्री होत असलेले टीन शेड आणि हातगाड्यानची तोडफोड केली. यामुळे गावात दारूबंदी विरोधातील वातावरण तापले होते.
अकोला शहरालगतच्या गुडधी गावात दारू विरोधात मातृशक्तीचा एल्गार पाहण्यास मिळाला. गावात अवैधपणे विक्री होत असलेल्या दारू बंदीची अनेकदा मागणी करण्यात आली होती. मात्र दारू बंदी होत नसल्याने गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक झाल्या होत्या. यासाठी महिलांनी एकत्र येत दारू विक्री होणा-या घरांवर स्वत: छापा मारला. महिलांनी आक्रमक होत दारू विक्री करणा-यांच्या घरातील दारू साठा उध्वस्त केला.
टिन शेडची केली तोडफोड
गुडधी गावातील अवैध दारू विक्री विरोधात गावातील महिलांकडून अनेकदा पोलीस तक्रारी केल्या होत्या. मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे महिलांनी आज गावात दारू विक्री होत असलेले टीन शेड आणि हातगाड्यांची देखील तोडफोड केली. गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांनी प्रचंड राडा केल्याचे पाहण्यास मिळाले. महिलांच्या आक्रमकतेमुळे दारू विक्रेत्यांची पाचावर धारण बसली.
















